स्वतःला वकील व न्यायाधीश असल्याची बतावणी करून तरुणांची फसवणूक; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव | प्रतिनिधी
शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत जळगावातील दोन तरुणांची तब्बल ५५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे संदेश शिरसाट (रा. कल्याण) आणि गोविंद स्वार (रा. बदलापूर) अशी आहेत.
या प्रकरणात हॉटेल व्यावसायिक कुणाल रवींद्र नाईक (वय ३९, रा. नेताजी चौक, मेहरुण) यांनी आपल्या भावाला शासकीय नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने मोठी रक्कम उकळल्याची तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्यात यापूर्वीच दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.
पोलिस तपासादरम्यान संदेश शिरसाट आणि गोविंद स्वार यांचा या फसवणूक प्रकरणात सहभाग उघडकीस आला. दोघेही स्वतःला वकील आणि न्यायाधीश असल्याची बतावणी करून विश्वास संपादन करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, या फसवणूक रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
