अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा, पुरवठा साखळीच्या तपासाला वेग
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव एमआयडीसी परिसरातील एका गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकून तब्बल १२ लाख १५ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. १४ जुलै रोजी करण्यात आलेल्या या कारवाईनंतर वकार शेख जब्बार शेख (वय ३२) आणि धीरज मिश्रा (दोघे रा. शाहूनगर) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोदामातून ४,८०० पाकिटे जप्त
सहआयुक्त (अन्न) दिनानाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंके आणि आकाश बोराडे यांनी एम-१२४ सेक्टरमधील गोदामाची तपासणी केली. तपासणीदरम्यान गोवा गुटख्याची एकूण ४,८०० पाकिटे आढळून आली.
यामध्ये प्रत्येकी ७५ पाऊच असलेली ३,३०० पाकिटे आणि २६ पाऊच असलेली १,५०० पाकिटे असा मोठा साठा जप्त करण्यात आला. जप्त मालाची एकूण किंमत १२.१५ लाख रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले.
पुरवठा साखळीचा तपास सुरू
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त करण्यात आलेला गुटखा नेमका कुठून आणला गेला, तो कुठे पुरवठा केला जाणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडून सुरू आहे.
