खेडी गावातील अपघाताने खळबळ; जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील खेडी गावात भरधाव वाळूच्या डंपरने पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने त्याच्या दोन्ही पायांवरून डंपर गेल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१५ जुलै) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात प्रितम संभाजी पाटील (वय ३५, रा. श्रीकृष्णनगर, खेडी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
प्राथमिक माहितीनुसार, खेडी गावातील अरुंद रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूच्या डंपरने पायी चालत असलेल्या प्रितम पाटील यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर डंपर त्यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने त्यांच्या पायांचा गंभीर चेंदामेंदा झाला.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रितम पाटील हे नाशिक येथील एका खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेमुळे खेडी गावात हळहळ व्यक्त होत असून, भरधाव अवजड वाहनांवर नियंत्रण आणण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
