Spread the love

डायल 112 वरून माहिती मिळताच धुळे शहर पोलिसांची तातडीची कारवाई; चोरीतील ₹१५ हजारांचा मुद्देमाल जप्त

धुळे | प्रतिनिधी

धुळे शहरातील दसरा मैदान परिसरातील पूर्वमुखी हनुमान मंदिरात चोरी करून पळून जाणाऱ्या १९ वर्षीय चोरट्याला धुळे शहर पोलिसांनी अवघ्या काही वेळात पाठलाग करून रंगेहात अटक केली. डायल ११२ वर मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत चोरीतील ₹१५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, नागरिकाच्या सतर्कतेमुळे आरोपीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.०५ वाजता डायल ११२ वरून दसरा मैदान येथील पूर्वमुखी हनुमान मंदिरात चोरी झाल्याची माहिती धुळे शहर पोलीस ठाण्याच्या बिट मार्शल क्रमांक १ यांना मिळाली. माहिती मिळताच धुळे शहर पोलीस ठाण्याचे डी.बी. पथक घटनास्थळी दाखल झाले. मंदिराची पाहणी केल्यानंतर चोरी झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी परिसरात चोरट्याचा शोध सुरू केला.

याचदरम्यान मोटारसायकलवरून जाणारे सचिन वाडीले यांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी एका तरुणाला खांद्यावर पेटीसारखी वस्तू घेऊन सहजीवन नगरकडे जाणाऱ्या भुयारी रेल्वे बोगद्याच्या दिशेने पळताना पाहिल्याचे सांगितले.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली. काही वेळातच खांद्यावर दोन पेट्या घेऊन पळणारा एक संशयित तरुण दिसून आला. पोलिसांनी तत्काळ त्याला अडवून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव समीर शहा रमजान शहा (वय १९, रा. शंभर फुटी रोड, इब्राहिम मशिदीजवळ, धुळे) असे सांगितले. त्याने पूर्वमुखी हनुमान मंदिरात चोरी केल्याची कबुलीही दिली.

आरोपीच्या झडतीत मंदिरातील चोरीचा ₹१५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या यशस्वी कारवाईत नागरिक सचिन वाडीले यांच्या सतर्कतेमुळे आरोपीला रंगेहात पकडणे शक्य झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चौधरी तसेच पोलीस अंमलदार रविकिरण राठोड, कुंदन पटाईत, महेश मोरे, राहुल सरदार, सचिन जैतपुरे, रोहिणी पवार, अमोल पगारे, तुषार पारधी, प्रशांत नाथजोगी, अमित रणमळे, धम्मपाल वाघ, योगेश वानखेडे आणि शाहीद शेख यांच्या पथकाने पार पाडली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version