Spread the love

अजिंठा चौफुली ते विमानतळ मार्गावर आधुनिक प्रकाश व्यवस्था; नागरिकांच्या सुरक्षिततेसह शहराच्या सौंदर्यातही भर पडणार

जळगाव |प्रतिनिधी

जळगाव शहरातील प्रमुख मार्ग अधिक सुरक्षित, सुशोभित आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सन २०२६-२७ च्या आर्थिक वर्षातील अपारंपारिक ऊर्जा विकास लेखाशीर्षांतर्गत ५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली असून, या निधीतून शहरातील प्रमुख मार्गावर आधुनिक एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहेत.

अजिंठा चौफुली ते विमानतळ मार्ग उजळणार

मंजूर निधीतून अजिंठा चौफुली ते विमानतळ या शहरातील महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गावर अत्याधुनिक एलईडी पथदिवे उभारले जाणार आहेत. यामुळे या मार्गावरील प्रकाश व्यवस्थेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असून, विमानतळाकडे ये-जा करणारे प्रवासी, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. आधुनिक प्रकाश व्यवस्थेमुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.

दोन वर्षांच्या पाठपुराव्याला यश

या विकासकामासाठी आमदार सुरेश भोळे यांनी गेल्या दोन वर्षांपासून मंत्रालयापासून स्थानिक प्रशासनापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रस्तावाला पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांचेही सहकार्य लाभल्याने निधी मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.

राज्य नेतृत्वाचे मानले आभार

निधी मंजूर झाल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारमंत्री गिरीश महाजनमंत्री संजय सावकारे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

यावेळी बोलताना आमदार भोळे म्हणाले की, “जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असून, आगामी काळातही शहरासाठी मोठा निधी आणण्याचा प्रयत्न सुरू राहील.”

Share.
Leave A Reply

Exit mobile version