विद्यार्थ्यांचे भविष्य, पर्यावरण संरक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या समर्थनार्थ एकजुटीचा निर्धार; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव | प्रतिनिधी
लडाखमधील शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित विविध मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला १९ दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जळगावातील जागरूक नागरिकांनी त्यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा जाहीर केला आहे. या अनुषंगाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात जळगावातील गजानन मालपुरे यांच्या कार्यालयात समविचारी नागरिकांची बैठक पार पडली. बैठकीस गजानन मालपुरे, शरद तायडे, ॲड. जमील देशपांडे, विनोद शिंदे, अशोक लाडवंजारी, जमील शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
बैठकीत विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण व्यवस्था, पर्यावरण संरक्षण आणि लोकशाही मार्गाने मांडलेल्या मागण्यांच्या समर्थनार्थ जळगावातून एकजुटीने आवाज उठविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी दुपारी १२ ते १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे शांततापूर्ण निदर्शने आयोजित करण्यात येणार आहेत.
उपस्थितांनी मत व्यक्त केले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न हा केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण देशातील तरुणाईच्या भविष्याशी निगडित आहे. शिक्षण, पर्यावरण आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देणे ही प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे.
बैठकीत जळगाव शहर व जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था, युवक संघटना, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, पालक तसेच जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने निदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
निदर्शनाचा तपशील
-
दिवस : सोमवार
-
वेळ : दुपारी १२.०० ते १.००
-
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन गजानन मालपुरे, ॲड. जमील देशपांडे, जमील शेख, शरद तायडे, अशोक लाडवंजारी, चंद्रकांत पाटील, विनोद शिंदे, सुनील माळी, ज्ञानेश्वर कोळी, पियुष गांधी, प्रमोद पाटील, ललित शर्मा, विनायक पाटील, चेतन पवार, प्रदीप पाटील, रमेश पाटील यांच्यासह आयोजकांनी केले आहे.
