Spread the love

तहसील कार्यालयाला विद्यार्थ्यांची भेट • तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांचे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मार्गदर्शन

नंदुरबार | प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना प्रशासनाची कार्यपद्धती प्रत्यक्ष समजावी, नागरिकांमध्ये सुजाण नागरिकत्वाची भावना निर्माण व्हावी आणि विद्यार्थी व प्रशासन यांच्यात विश्वासाचे नाते दृढ व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)च्या वतीने ‘अमृत संवाद सेतू’ हा अभिनव उपक्रम नंदुरबार येथे उत्साहात पार पडला.

नंदुरबार येथील तहसील कार्यालयात आयोजित या उपक्रमात तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत तहसील कार्यालयाच्या विविध विभागांची सविस्तर माहिती दिली. पुरवठा विभाग, महसूल विभाग, निवडणूक विभाग तसेच तहसील कार्यालयाच्या अखत्यारितील विविध शासकीय कामकाज, योजना, नियम व अटी-शर्ती यांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष देण्यात आली.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध शासकीय कार्यालयांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज, शासनाच्या विविध योजना, नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवा, प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

‘अमृत संवाद सेतू’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जबाबदारी, संविधानिक मूल्यांची जाणीव आणि लोकशाही प्रक्रियेबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध विभागांचे कार्य जवळून समजून घेण्याबरोबरच त्यांच्या शंकांचे थेट निरसन करण्याची संधीही मिळाली.

या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात प्रभावी संवाद निर्माण होऊन परस्पर विश्वास अधिक दृढ होईल तसेच भविष्यात सुजाण, जबाबदार आणि राष्ट्रहिताची जाणीव असलेली नागरिकांची पिढी घडण्यास मदत होईल, असा विश्वास ‘अमृत’च्या वतीने व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमात नंदुरबार येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तसेच दुर्गाबाई रघुवंशी विद्यालय येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षकवर्ग सहभागी झाला होता. आगामी काळात विद्यार्थ्यांना इतर महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांची माहिती मिळावी यासाठी अशाच प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश अहिरे यांनी केले, तर दिनेश पाठक यांनी आभार मानले.

संपर्क : जिल्हा व्यवस्थापक (अमृत), योगेश अहिरे – 91122 28771,  अमृत मित्र, दिनेश पाठक – 8087953940

Share.
Leave A Reply

Exit mobile version