अनिल पाटील उपमुख्याध्यापक, भारती पाटील पर्यवेक्षिका; गुणवत्तापूर्ण वाटचालीची शासनाकडून दखल
धरणगाव | प्रतिनिधी
धरणगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. विद्यालयाच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रगती, वाढती विद्यार्थीसंख्या आणि उत्कृष्ट गुणवत्तेची दखल घेत शासनाने सन २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार प्रथमच उपमुख्याध्यापक पदाला मंजुरी दिली आहे.
या पदावर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक अनिल पाटील यांची उपमुख्याध्यापक म्हणून, तर भारती पाटील यांची पर्यवेक्षिका म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यालयाने गेल्या काही वर्षांत दहावी-बारावीच्या परीक्षांतील उल्लेखनीय निकाल, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि विविध सहशालेय उपक्रमांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. वाढत्या विद्यार्थीसंख्येमुळे शासनाच्या निकषांनुसार उपमुख्याध्यापक पदाची मान्यता मिळाल्याने शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नवनियुक्त उपमुख्याध्यापक अनिल पाटील यांनी अध्यापनासह शालेय प्रशासन, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. तर भारती पाटील यांनी गुणवत्तावृद्धी, शैक्षणिक नियोजन आणि विद्यार्थीकेंद्री अध्यापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
या नियुक्तीबद्दल संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील, सचिव सी. के. पाटील तसेच संचालक अनुराग वाजपेयी यांनी दोघांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापिका सुरेखा पाटील, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
प्रथमच उपमुख्याध्यापक पदाची मिळालेली मान्यता ही संस्थेच्या गुणवत्तापूर्ण वाटचालीची पावती असून धरणगावच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
