Spread the love

२४ जुलैला प्रारूप मतदार यादी, २९ जुलैपर्यंत हरकती; ४ ऑगस्टला अंतिम यादी प्रसिद्ध होणार

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील मुदत संपलेल्या, मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी वेगाने सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश १५ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आला असून, निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आता सुरू होणार आहे.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३-के आणि २४३-झेडए अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नियोजन, पर्यवेक्षण आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. त्यानुसार सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

आयोगाच्या आदेशानुसार १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आधार म्हणून वापरण्यात येणार आहे. ही यादी संगणक प्रणालीद्वारे प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप व अंतिम मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत. यासाठी महाआयटीने विकसित केलेल्या विशेष सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार असून, जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांना स्वतंत्र युजर आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मतदार यादीचे वेळापत्रक

  • २४ जुलै २०२६ : प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

  • २४ ते २९ जुलै २०२६ : हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार

  • ४ ऑगस्ट २०२६ : अंतिम मतदार यादी प्रकाशित

आयोगाने स्पष्ट केले आहे की, हरकतींच्या माध्यमातून केवळ लेखनातील त्रुटी, चुकीच्या प्रभागात समाविष्ट झालेल्या मतदारांची दुरुस्ती किंवा विधानसभा मतदार यादीत नाव असूनही ग्रामपंचायत मतदार यादीत नाव वगळले गेले असल्यास अशा मर्यादित दुरुस्त्याच करता येणार आहेत. विधानसभा मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे किंवा पत्त्यात बदल करणे या टप्प्यावर शक्य होणार नाही.

प्रारूप आणि अंतिम मतदार याद्यांना व्यापक प्रसिद्धी देण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय, स्थानिक वृत्तपत्रे तसेच केबल टीव्हीच्या माध्यमातून या याद्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया विहित मुदतीत आणि त्रुटीरहित पार पाडण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी व तहसीलदारांवर सोपविण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, पात्र मतदारांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले नाव, प्रभाग व इतर तपशील तपासून आवश्यक असल्यास निर्धारित मुदतीत हरकती अथवा सूचना सादर करण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version