चार अंगणवाड्यांचा भार दोनच इमारतींवर; वर्क ऑर्डरनंतरही कामाला सुरुवात नाही
रतन अडकमोल । एरंडोल तालुका ग्रामीण प्रतिनिधी ।
कढोली गावातील अंगणवाडी इमारतींच्या दुरवस्थेमुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गावात चार अंगणवाड्या सुरू असल्या तरी त्यापैकी दोन इमारती जीर्ण व धोकादायक झाल्याने गेल्या दीड ते दोन वर्षांपासून चारही अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांना केवळ दोनच इमारतींमध्ये बसविण्यात येत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर बनत असून पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीने दोन्ही नवीन अंगणवाड्यांसाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यापैकी एका अंगणवाडीच्या बांधकामासाठी वर्क ऑर्डर मंजूर होऊन चार ते पाच महिने उलटले असतानाही प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
जुनी अंगणवाडी इमारत अत्यंत जीर्ण झाली असून भिंतींना तडे गेले आहेत. ही इमारत पाडून त्याच ठिकाणी नवीन अंगणवाडी उभारण्याची मागणी ग्रामस्थ आणि पालकांनी अनेकदा केली आहे. मात्र, तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गावातील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. संबंधित विभागाने तातडीने रखडलेले बांधकाम सुरू करून नवीन अंगणवाडी इमारतीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी पालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ठेकेदाराचे नावही अस्पष्ट
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वर्क ऑर्डर मंजूर होऊन चार ते पाच महिने झाले असले तरी संबंधित ठेकेदाराचे नाव महिला व बालविकास विभागालाही स्पष्टपणे सांगता आले नाही. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही ते फोन उचलत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
शैलजा पाटील, पर्यवेक्षिका, महिला व बालविकास विभाग, एरंडोल म्हणाल्या, “कढोली येथील अंगणवाडीच्या बांधकामाची वर्क ऑर्डर चार ते पाच महिन्यांपूर्वी निघाली आहे. संबंधित वर्क ऑर्डर बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आली आहे.”
