चेहरा, छाती, पोट व मानेवर सपासप वार; शहर पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव | प्रतिनिधी
दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणावर धारदार पट्टीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शहरातील गांधी मार्केट परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि. १५ जुलै) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गांधी मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या नागोरी दुकानासमोर हा प्रकार घडला. संशयिताने नशेच्या अवस्थेत खिशातून दोन धारदार पट्ट्या काढून हमेंत बाळकृष्ण कोळी (वय ३२, रा. दिनकरनगर) यांच्यावर चेहरा, छाती, पोट आणि मानेवर सपासप वार केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
जखमी हमेंत कोळी यांच्या फिर्यादीवरून बाळा शिंपी (रा. शिवाजीनगर, हुडको) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सतीश चिंचोळे करीत आहेत.
