‘भिल्ल’ जातीचे वैधता प्रमाणपत्र कायम; निवडणुकीनंतर दाखल झालेल्या तक्रारीवर समितीचा निर्णय
भडगाव | प्रतिनिधी
भडगाव नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. रेखा प्रदीप मालचे यांना जात पडताळणी समितीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राविरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार समितीने फेटाळून लावत त्यांचे ‘भिल्ल’ जातीचे वैधता प्रमाणपत्र कायम ठेवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. रेखा मालचे यांना सन २०१४ मध्ये नंदुरबार येथील जात पडताळणी समितीकडून ‘भिल्ल’ अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यानंतर २०२५ मध्ये झालेल्या भडगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी अनुसूचित जमातीसाठी राखीव जागेवरून निवडणूक लढवून विजय मिळवत लोकनियुक्त नगराध्यक्षपद पटकावले.
निवडणुकीनंतर त्यांच्याविरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार सुशीला शांताराम पाटील यांनी धुळे येथील जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्राबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर समितीने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तक्रार फेटाळून लावत जात वैधता प्रमाणपत्र कायम ठेवण्याचा निर्णय दिला.
या प्रकरणात नगराध्यक्ष रेखा मालचे यांच्या वतीने ॲड. बी. टी. अहिरे यांनी बाजू मांडली, तर ॲड. समाधान सोनवणे यांनी सहकार्य केले.
समितीच्या निर्णयानंतर भडगाव परिसरात रेखा मालचे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रेखा मालचे यांची प्रतिक्रिया
“सत्याचा विजय झाला आहे. विरोधकांनी केवळ राजकीय आकसापोटी व जनतेने नाकारल्याचा राग काढण्यासाठी ही तक्रार केली होती. समितीच्या या निर्णयामुळे लोकशाहीचा आणि भडगावच्या जनतेचा विजय झाला आहे.“
