Spread the love

आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला सहभाग

भुलेश्वर दुसाने  पाचोरा | प्रतिनिधी

पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने अरमान फाउंडेशन, पाचोरा यांच्या वतीने मानसिंगका नगर येथे भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आमदार किशोर (आप्पा) पाटील यांच्या शुभहस्ते पार पडलेल्या या उपक्रमात नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसर हिरवागार करण्याचा संकल्प केला.

यावेळी आमदार किशोर पाटील यांनी स्वतः वृक्षारोपण करून “झाडे लावा – झाडे जगवा” हा संदेश दिला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि तापमानवाढ यावर मात करण्यासाठी वृक्षसंवर्धन हाच सर्वात प्रभावी उपाय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला मार्केट कमिटीचे सभापती गणेश बापू पाटील, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष किशोर आप्पा बारबकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजय भाऊ गोहिल, नगरसेवक राहुल गायकवाड, हाजी अबोलीस भाई शेख, नगरसेवक संजय चौधरी, युवा उद्योजक मनोज भाऊ पाटील (एमएसपी), सुनील आप्पा जाधव, किशोर पाटील, शरद मराठे, शांताराम पाटील, पप्पू राजपूत, शुभम पाटील, उमेश एरंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी विविध प्रकारची वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला. परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी आणि भावी पिढीसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

अरमान फाउंडेशनच्या वतीने भविष्यातही पर्यावरण, सामाजिक जनजागृती आणि समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किशोर पुराणिक, विकी मराठी, राजू भैया, संजू पाटील, प्रशांत पाटील, प्रकाश चौधरी, प्रशांत भावसार, अमोल जाधव, पप्पू जाधव, संजय कानडे, गणेश चौधरी यांच्यासह सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी अरमान फाउंडेशनचे अध्यक्ष फहीम शेख यांनी उपस्थित मान्यवर, नागरिक आणि स्वयंसेवकांचे आभार मानले.

“झाडे लावा – झाडे जगवा, पर्यावरण वाचवा – भविष्य घडवा” हा संदेश देत कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण समारोप करण्यात आला

Share.
Leave A Reply

Exit mobile version