पाटोदा (गरडाचे) गावाजवळ चारचाकी-आयशरची समोरासमोर धडक; रस्ता दुरुस्तीतील निष्काळजीपणाचा आरोप, टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा
अहिल्यानगर | प्रतिनिधी (बापुसाहेब घोडेस्वार)
जामखेड-कर्जत मार्गावरील पाटोदा (गरडाचे) गावाजवळ रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात श्रीगोंदा येथे कार्यरत असलेल्या दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. चारचाकी कार आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या जोरदार धडकेत दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्ता दुरुस्तीच्या कामातील निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या अपघातात निखिल मोतीलाल बहुरे (रा. जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर, सध्या श्रीगोंदा) आणि रामचंद्र महाजन बहुरे (रा. बेंबळ्याचीवाडी, छत्रपती संभाजीनगर, सध्या श्रीगोंदा) या दोन चुलत भावांचा मृत्यू झाला. निखिल बहुरे हे श्रीगोंदा तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत होते, तर रामचंद्र बहुरे हे श्रीगोंदा पाटबंधारे विभागात मोजणीदार म्हणून सेवा बजावत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १९ जुलै) रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास दोघेही चुलत भाऊ आपल्या मूळ गावी छत्रपती संभाजीनगर येथून श्रीगोंदा येथे नोकरीच्या ठिकाणी एमएच-२० जीई-३५६२ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून जात होते. त्याचवेळी एमएच-१४ बीजे-२२९३ क्रमांकाचा आयशर टेम्पो श्रीगोंदा मार्गावरून जामखेडकडे येत होता.
पाटोदा (गरडाचे) गावाजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे एका बाजूची वाहतूक बंद करून एकाच लेनवरून वाहतूक सुरू होती. याच ठिकाणी दोन्ही वाहने समोरासमोर आल्याने भरधाव वेगात त्यांची भीषण धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि दोन्ही शासकीय कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर आयशर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघ, पोलिस कर्मचारी सचिन चव्हाण व अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहनाचे लोखंडी पत्रे कापून दोन्ही जखमींना बाहेर काढून जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संबंधित रस्त्यावरील दुरुस्तीच्या कामात पुरेशा सुरक्षेची उपाययोजना करण्यात न आल्याचा आरोप केला आहे. एकाच लेनवर वाहतूक सुरू असताना योग्य दिशादर्शक फलक, प्रकाशयोजना आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था नसल्याने हा अपघात घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.
जामखेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघ पुढील तपास करीत आहेत.
