Spread the love

पाझर तलाव परिसरात पर्यटनादरम्यान घडली दुर्घटना; होमगार्ड जवानाच्या एकुलत्या एक मुलाचा करुण अंत, यावल परिसरात हळहळ

हर्षल पाटील यावल | प्रतिनिधी

पर्यटनाचा आनंद क्षणार्धात शोकांतिकेत बदलल्याची हृदयद्रावक घटना यावल तालुक्यात घडली. सातपुडा जंगल परिसरातील हरिपुरा शिवारातील सुकी नदीच्या खोल डोहात बुडून १७ वर्षीय जयेश संजय फेगडे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे यावल शहरासह परिसरात शोककळा पसरली असून, होमगार्ड जवानाच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने फेगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत जयेश संजय फेगडे (वय १७, रा. महाजन गल्ली, यावल) हा यावल येथील होमगार्ड जवान संजय सिताराम फेगडे यांचा एकुलता एक मुलगा होता. रविवारी तो आपल्या चुलत भाऊ व वहिनीसोबत सातपुडा जंगलातील हरिपुरा शिवारात असलेल्या पाझर तलाव परिसरात पर्यटनासाठी गेला होता.

परिसरातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेत असताना जयेश सुकी नदीच्या डोहात पोहण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात बुडू लागला. काही क्षणातच तो नजरेआड झाल्याने त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी मदतीसाठी आर्त हाक दिली.

“आमचा भाऊ डोहात बुडत आहे, वाचवा!” असा आक्रोश करत त्यांनी परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर जयेशला डोहातून बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार अमित तडवी व वसीम तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जयेशला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेची रात्री उशिरा यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील पाटील पुढील तपास करीत आहेत.

जयेश हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या अकाली निधनाने फेगडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिक, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबीयांचे सांत्वन केले जात आहे.

ही घटना पुन्हा एकदा पावसाळ्यात नदी, धरणे, तलाव आणि खोल डोहांमध्ये पोहण्यासाठी उतरताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित करते. पर्यटनस्थळी सुरक्षिततेचे नियम पाळणे आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज नसताना पाण्यात उतरणे टाळावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे

Share.
Leave A Reply

Exit mobile version