Spread the love

गुजराती कॉम्प्लेक्समधील घटना; अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात

सुनील निकम शिरपूर (धुळे) | प्रतिनिधी

शिरपूर शहरातील मध्यवर्ती भागातील गुजराती कॉम्प्लेक्समधील एका कपड्याच्या दुकानाला रविवारी रात्री भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत कपड्यांसह शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्यही जळून खाक झाले.

माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास दुकानातून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तात्काळ शिरपूर अग्निशामक दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. आगीमुळे दुकानातील कपडे आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version