वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते उद्घाटन; नागरिकांना मिळणार अधिक जलद, पारदर्शक आणि आधुनिक सेवा
संघरत्न सपकाळे भुसावळ तालुका | प्रतिनिधी
भुसावळ येथील तहसील कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या सह-दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नव्या प्रशस्त व सुसज्ज इमारतीचे लोकार्पण राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. या आधुनिक इमारतीमुळे दस्त नोंदणीसह विविध शासकीय सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख पद्धतीने उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकार्पण सोहळ्यास उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, मंदार पाठक, सह-दुय्यम निबंधक नितीन सोनवणे, नगरपालिकेचे नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री संजय सावकारे यांनी नव्या इमारतीची पाहणी करून उपलब्ध कार्यालयीन सुविधांचा आढावा घेतला. नागरिकांना दस्त नोंदणीसाठी अधिक सुलभ, सुरक्षित आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या इमारतीमुळे नागरिकांचा वेळ वाचेल, कार्यालयीन कामकाजात गती येईल आणि सेवा वितरण अधिक परिणामकारक होईल, असेही त्यांनी नमूद केले.
उपस्थित मान्यवरांनीही नव्या इमारतीमुळे दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होऊन कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला.
उद्घाटनानंतर उपस्थितांनी इमारतीतील विविध सुविधांची पाहणी केली. प्रशस्त कार्यालयीन व्यवस्था, नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधा आणि आधुनिक पायाभूत रचनेचे उपस्थितांनी स्वागत केले. या नवीन इमारतीमुळे भुसावळ व परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि वेळेत शासकीय सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
