गुप्त माहितीच्या आधारे शेतात टाकला छापा; ₹९१ हजारांचा मुद्देमाल जप्त, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा
धीरज सेतवाल जळगाव | प्रतिनिधी
नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर पोलिसांनी मंगळवारी (दि. २१) धडक कारवाई करत दोन जणांना अटक केली. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, सुमारे ९१ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नशिराबाद ते सुनसगाव मार्गावरील एका शेतात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना मिळाली होती. त्यानंतर खाजगी पंटरमार्फत माहितीची खात्री करून दुपारी सुमारे २.२० वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला.
या कारवाईत प्रदीप जनार्दन रोटे (वय ५७) आणि कैलास संजय भोई (दोघेही रा. नशिराबाद) यांच्या माध्यमातून कुंटणखाना चालविला जात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. दोघांना तात्काळ अटक करण्यात आली.
कारवाईदरम्यान दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, घटनास्थळावरून गुन्ह्याशी संबंधित ₹९१,०६० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) अधिनियम अंतर्गत कलम ३, ४, ५ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलीस पथकाने केली.
