विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर एकजूट दाखविण्याचे आवाहन; शांततामय मार्गाने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
सोयगाव | वार्ताहर
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांशी संबंधित कथित घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर सोयगाव शहर बंद ठेवण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या सोयगाव तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सोयगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोरे साहेब यांना निवेदन सादर केले. निवेदनात शहरातील नागरिक, व्यापारी संघटना, सामाजिक संस्था, कामगार, युवक तसेच विविध घटकांनी शांततामय व लोकशाही मार्गाने बंदमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांप्रती एकात्मता व्यक्त करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. सोयगाव शहरातील सर्व व्यापारी, नागरिक व सामाजिक संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, तालुका उपाध्यक्ष शिवराम जाधव, शरद पवार, मनोहर जगताप, बनकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून पोलिस प्रशासनाकडे ते सुपूर्द केले.
