Spread the love

पी.आर. हायस्कूलमध्ये आदरांजली कार्यक्रम; शिक्षकांनी अजितदादांच्या कार्याला दिला उजाळा

भवरखेडे प्रतिनिधी | अजय बाविस्कर

धरणगाव : येथील पी. आर. हायस्कूलमध्ये माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची ६७ वी जयंती उत्साहात व श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील होते. यावेळी विचार मंचावर पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी, ज्येष्ठ शिक्षक डॉ. बापू शिरसाठ, संदीप घुगे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्षांच्या हस्ते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक करताना ज्येष्ठ शिक्षक डॉ. बापू शिरसाठ यांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या आठवणी म्हणजे शब्दात न मावणारा मोठा ठेवा असल्याचे सांगितले. दादांना केवळ शब्दांनी नव्हे, तर कृतीतून आदरांजली वाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी, गणेश सूर्यवंशी आणि संजय बेलदार यांनी अजितदादा पवार यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला.

अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक डी. एस. पाटील यांनी सांगितले की, “अजितदादा पवार म्हणजे केवळ एक नाव नसून एक विचार आहे.” सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेणारा, गोरगरिबांसाठी सातत्याने काम करणारा आणि “आधी काम मग बाकी सर्व” हा मंत्र जपणारा नेता म्हणून त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी राहील, असे त्यांनी सांगितले.

राजकारण म्हणजे केवळ भाषणबाजी नसून जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम आहे, हे अजितदादांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची शपथ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरज शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोपाल चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version