केळी पिकावरील कीड-रोग नियंत्रण व उत्पादनवाढीबाबत मार्गदर्शन; कढोली येथे शेती शाळा उत्साहात .2026
कृषी विभागाचा उपक्रम; संशोधक व तज्ज्ञांकडून आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादन खर्च कमी करण्याचे उपाय आणि उत्पादनवाढीबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन
रतन अडकमोल एरंडोल तालुका ग्रामीण प्रतिनिधी :
दिनांक १६ जुलै २०२६ रोजी कढोली येथे शेतकरी प्रशांत अशोक पाटील यांच्या केळीच्या शेतात महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या वतीने शेती शाळा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री. प्रतीक पाटील यांच्या कार्यक्षेत्रात झालेल्या या कार्यक्रमात केळी पिकावरील कीड-रोग नियंत्रण, उत्पादनवाढ आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मंडळ कृषी अधिकारी ईश्वर पवार यांच्या हस्ते झाली. यावेळी केळी संशोधन केंद्र, जळगावचे डॉ. व्ही. टी. बडगुजर, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबादचे डॉ. किरण मांडवडे व डॉ. टी. बी. गोरे तसेच जिल्हा उद्योग केंद्र, जळगावचे विजय सैंदाणे यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनात केळी पिकावरील कीड व रोगांचे प्रभावी व्यवस्थापन, उत्पादन खर्च कमी करण्याच्या उपाययोजना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार व अधिक उत्पादन घेण्याच्या पद्धती यांची माहिती देण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून शंकानिरसन करून घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक कृषी अधिकारी सचिन दत्तात्रेय पाटील, सचिन पाटील आणि भूषण वाघ यांनी परिश्रम घेतले.
या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळून उत्पादनवाढीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
