Spread the love

धुळ्यात एसटी बसच्या छताला गळती; विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल

शिंदखेडा आगाराच्या बसमधील प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल; एसटीच्या देखभालीवर प्रवाशांकडून प्रश्नचिन्ह

सुनील निकम  शिंदखेडा (धुळे) | प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आगाराच्या एसटी बसच्या छताला गळती लागल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल झाल्याची घटना समोर आली आहे. बसच्या छतामधून पावसाचे पाणी थेट प्रवाशांवर गळत असल्याने अनेक प्रवासी आणि विद्यार्थी प्रवासादरम्यान भिजले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, एसटी महामंडळाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमराळे येथून शिंदखेड्याकडे जाणाऱ्या शिंदखेडा आगाराच्या बसमध्ये हा प्रकार घडला. बसच्या छतामधून सतत पाणी गळत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यानंतर संतप्त प्रवाशांनी या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

या घटनेनंतर परिवहन विभागाच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थी आणि प्रवाशांच्या सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी शासन प्रयत्नशील असताना, एसटी महामंडळाच्या नियोजनशून्य व निष्काळजी कारभारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जुन्या आणि नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावू देण्याऐवजी त्यांची वेळेवर दुरुस्ती करूनच सेवेत उतरवाव्यात, अशी मागणीही प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version