Spread the love

दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जचे धुळ्यात पडसाद; वंचित बहुजन आघाडीचा आक्रमक ‘रास्ता रोको’

महाराष्ट्र बंदला डाव्या पक्षांचा पाठिंबा; कराचीवाला खुंट परिसरात वाहतूक विस्कळीत, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

सुनील निकम धुळे | प्रतिनिधी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात गुरुवारी आक्रमक आंदोलन करण्यात आले. डाव्या पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिल्याने शहरात सकाळपासूनच आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले.

आंदोलनाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी शहरातील कराचीवाला खुंट परिसरात एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला.

आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे हे लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप केला. आंदोलनामुळे काही काळ शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धुळे पोलिसांनी आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version