दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदला पाठिंबा; शांततेच्या मार्गाने आंदोलन
सुरेश पाटोळे पारोळा | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पारोळा शहरात बंद पाळून शांततामय मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दि. २० जुलै २०२६ रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींवर दिल्ली पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते.
या पार्श्वभूमीवर पारोळा शहरात तालुका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोर्चा काढला. यावेळी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करण्यात आला तसेच केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे चुकीचे असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. यावेळी तालुका व शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
