Spread the love

आजचा विद्यार्थी उद्याचा शिल्पकार… पण दिशाहीन?

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर विद्यार्थी संघटनांनी स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ

देशाचे भविष्य घडविण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती विद्यार्थ्यांमध्ये आहे. म्हणूनच “आजचा विद्यार्थी हा उद्याचा शिल्पकार” असे अभिमानाने म्हटले जाते. मात्र आज देशभरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे पाहिले, तर हा शिल्पकारच असुरक्षित आणि संभ्रमित झाल्याचे चित्र दिसून येते. स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील अनियमितता, वाढती बेरोजगारी आणि शिक्षणातील वाढते प्रश्न यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले जात आहे.

नुकत्याच घडलेल्या कथित पेपरफुटी प्रकरणानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत विद्यार्थ्यांनी आंदोलन, धरणे आणि उपोषणे करून न्यायाची मागणी केली. या आंदोलनाला विविध सामाजिक आणि विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला. विशेष म्हणजे भारतीय विद्यार्थी मोर्चा या संघटनेने जाहीरपणे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत त्यांच्या न्याय्य मागण्यांच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका घेतली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेण्याचा हा प्रयत्न अनेक विद्यार्थ्यांना दिलासादायक वाटला.

याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) कडूनही अनेकांना स्पष्ट भूमिका अपेक्षित होती. कारण ही संघटना अनेकदा विद्यार्थ्यांचे नेतृत्व करण्याचा आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा दावा करत असते. त्यामुळे पेपरफुटीसारख्या गंभीर प्रश्नावर तिची भूमिका काय होती, हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात निर्माण झाला आहे.

येथे कोणत्याही संघटनेवर आरोप करणे हा उद्देश नाही. मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित इतक्या मोठ्या प्रश्नावर प्रत्येक विद्यार्थी संघटनेने आपली भूमिका स्पष्ट करणे ही लोकशाहीतील नैतिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना जेव्हा अन्याय झाल्याची भावना निर्माण होते, तेव्हा त्यांच्या पाठीशी उभे राहणे, शासनाकडे प्रश्न मांडणे, पारदर्शक चौकशीची मागणी करणे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणे, हेच विद्यार्थी संघटनांचे खरे कर्तव्य ठरते.

विद्यार्थ्यांचे प्रश्न हे कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा विचारसरणीचे नसतात. ते देशाच्या भविष्याचे प्रश्न असतात. लाखो युवक वर्षानुवर्षे अभ्यास करतात, पालक कर्ज काढून शिक्षण देतात आणि एकच स्वप्न पाहतात—प्रामाणिकपणे परीक्षा देऊन नोकरी मिळवण्याचे. पण जर पेपरफुटी, गैरव्यवहार आणि व्यवस्थेतील त्रुटींमुळे त्यांचे भविष्य धोक्यात आले, तर त्या विद्यार्थ्यांच्या वेदनेला आवाज देणे ही प्रत्येक विद्यार्थी संघटनेची जबाबदारी आहे.

आज विद्यार्थ्यांना घोषणांपेक्षा कृतीची गरज आहे. त्यांच्या संघर्षाच्या वेळी कोण त्यांच्या सोबत उभे राहिले आणि कोणाची भूमिका काय होती, याचे मूल्यमापन विद्यार्थी स्वतः करतील. कारण विद्यार्थी आज सुजाण आहे; तो केवळ भाषणांवर विश्वास ठेवत नाही, तर प्रत्यक्ष कृतीकडे पाहतो.

विद्यार्थी संघटनांनी वैचारिक मतभेद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. अन्यथा “विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतो” हा दावा केवळ घोषणांपुरताच मर्यादित राहील.
शेवटी एवढेच— विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने वाचवायची असतील, तर प्रत्येक विद्यार्थी संघटनेने प्रसंगानुरूप आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नाहीतर असेच म्हणावेसे वाटेल की, आजचा विद्यार्थी उद्याचा भविष्य आहे मात्र तो मिस गाईड आहे.कारण इतिहास घोषणांची नव्हे, तर विद्यार्थ्यांसाठी उभे राहिलेल्या कृतीची नोंद ठेवतो.

विद्रोही पत्रकार
सुरेश जगताप उल्हासनगर
९०४९०७९०३२

Share.
Leave A Reply

Exit mobile version