सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा
जगदीश सपकाळे जळगाव | प्रतिनिधी
रामानंद नगर पोलिसांनी पिंप्राळा येथील पान मसाल्याच्या दुकानातील घरफोडीचा गुन्हा वेगाने उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला ३७ हजार ८०० रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.
७ जुलै २०२६ रोजी पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केट येथील पान मसाल्याच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांच्या सिगारेटचे १० बॉक्स आणि रोख रक्कम असा एकूण ३७,८०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (३) व ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.
तपासादरम्यान सिद्धार्थ विनोद आढाळे (वय १९, रा. पिंप्राळा हुडको) आणि दीपक भगवान सोनवणे (वय २०, रा. पिंप्राळा हुडको) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी घरफोडीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. सुखाकर अंभोरे, सुशील चौधरी, अतुल चौधरी तसेच पोकॉ. सागर नवघरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
