Spread the love

आदिवासींच्या १४ प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी टायगर सेनेचे प्रशासनाला निवेदन

दफनभूमी, शबरी घरकुल, वनहक्क, रोजगार, रेशन, मत्स्यव्यवसाय व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासह विविध प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी

विनोद मोरे  जळगाव | प्रतिनिधी

आदिवासी टायगर सेनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत पालकमंत्री, जिल्हा परिषद, महसूल, वन, ग्रामीण विकास, महिला व बालविकास, मत्स्य व्यवसाय, उद्योग केंद्र, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. अनेक आंदोलने व उपोषणे करूनही प्रश्न सुटत नसल्याने प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात आदिवासी समाजासाठी गावागावात स्वतंत्र दफनभूमी उपलब्ध करून तिची ७/१२ नोंद आदिवासी दफनभूमीच्या नावाने करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच जन्मनोंद नसलेल्या नागरिकांसाठी आधार कार्ड, रेशनकार्ड, जातीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली.

शबरी घरकुल योजना पुन्हा सुरू करून तिची अंमलबजावणी आदिवासी विकास प्रकल्पामार्फत करावी, नव्या रेशनकार्डधारकांसाठी स्वतंत्र धान्य कोटा वाढवावा, बेरोजगार आदिवासी युवकांना विविध शासकीय कर्ज व रोजगार योजनांचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व अग्रणी बँकेने प्रभावी अंमलबजावणी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय अतिक्रमणावरील जागांचे नियमितीकरण, वनहक्क दावे निकाली काढणे, स्थानिक धरणांवरील मत्स्य व्यवसायात आदिवासींना प्राधान्य, दुर्गम वस्त्यांवर अंगणवाडी मंजूर करणे, कागदपत्रांविना वंचित असलेल्या आदिवासींना आरोग्य, शिक्षण व इतर मूलभूत अधिकार उपलब्ध करून देणे, कुलदैवतांच्या मूर्ती स्थापनेस परवानगी, एरंडोल येथे आदिवासी विकास प्रकल्पाच्या उपकार्यालयाचे काम तातडीने सुरू करणे, पोलिस ठाण्यांमध्ये आदिवासींच्या तक्रारींची दखल घेणे तसेच आदिवासी विकास प्रकल्पाच्या विविध योजनांसाठी निधी वाढविण्याच्या मागण्यांचाही समावेश आहे.

प्रशासनाने संबंधित विभागांमार्फत या मागण्यांवर प्रत्यक्ष कार्यवाही करून त्याबाबतची लेखी माहिती द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनावर आदिवासी टायगर सेनेचे राज्य प्रवक्ता पंढरीनाथ मोरे, महासचिव सुनिल गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुनिल सोनवणे, सल्लागार बाळू ठाकरेएकनाथ गायकवाड, माजी सभापती भूषण भिलविजय मालचे, धरणगाव शहरप्रमुख जितेंद्र मोरे, सचिव विनोद मोरेवासुदेव गायकवाड, एरंडोल युवा अध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version