पोलीस अधिकारी असल्याची बतावणी; माजी सैनिकाची ₹10 लाखांची ऑनलाइन फसवणूक
व्हॉट्सअॅपवर विश्वास संपादन करून RTGS द्वारे रक्कम उकळली; जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव | प्रतिनिधी
पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून एका ७० वर्षीय माजी सैनिकाची तब्बल ₹१० लाखांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामोदर राजधर चौधरी (वय ७०, व्यवसाय – माजी सैनिक, रा. फुलगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) यांच्याशी २५ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२६ या कालावधीत ७७३८९४१५१२ या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. संबंधित व्यक्तीने स्वतःचे नाव संदीप शर्मा असल्याचे सांगत आपण पोलीस अधिकारी असल्याचा बनाव केला.
फिर्यादीचा विश्वास संपादन केल्यानंतर विविध कारणे सांगून आरोपीने RTGS व्यवहाराद्वारे टप्प्याटप्प्याने एकूण ₹१० लाख स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेतल्याचा आरोप आहे. काही दिवसांनंतर फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर दामोदर चौधरी यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून संबंधित मोबाईलधारकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६६(डी) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे.
