भर पावसात १२५ रोपांचे वृक्षारोपण; २६० युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
निर्मल यूथ फाउंडेशन व जीजीयुएस फाउंडेशनचा पर्यावरण संवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम
डोंबिवली | सुरेश जगताप
पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून देत निर्मल यूथ फाउंडेशन (NYF) आणि जीजीयुएस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली (पूर्व) येथील रेल्वे कॉलनी गार्डनमध्ये शनिवारी (दि. २५ जुलै) भव्य वृक्षारोपण अभियान उत्साहात पार पडले. मुसळधार पावसाची पर्वा न करता तब्बल २६० स्वयंसेवकांनी या उपक्रमात सहभागी होत १२५ विविध प्रजातींच्या रोपांची लागवड केली.
या उपक्रमाला कल्याण-डोंबिवली महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मा. कोकरे सर, मा. घोडेकर सर तसेच अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
या उपक्रमाचे नेतृत्व कु. अक्षता औटी आणि श्री. गगन शिंदे यांनी केले. प्रगती महाविद्यालय (ज्युनिअर व डिग्री विभाग), मंजुनाथ महाविद्यालय, वंदे मातरम् महाविद्यालय, मॉडेल महाविद्यालय, गार्डियन महाविद्यालय आणि साऊथ इंडियन महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेला बळ दिले.
उपक्रमात AGR Foundation, Smadhuna Foundation, Eagle Brigade Foundation, MMJC Group आणि Parab Associates यांनीही सक्रिय सहभाग नोंदवत आयोजनाच्या यशात मोलाची भूमिका बजावली.
वृक्षारोपणासोबतच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. लागवड करण्यात आलेल्या सर्व रोपांच्या संरक्षणाची जबाबदारी सहभागी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी स्वीकारली.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी सर्व उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेत भविष्यात अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचा निर्धार व्यक्त केला. विविध संस्था, स्वयंसेवक, महाविद्यालये आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
