Spread the love

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्मृतिदिनानिमित्त ‘अर्धा तास वाचन करूया’ उपक्रम उत्साहात

वाचनातून डॉ. कलाम यांना अभिवादन; विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी राज्यशास्त्र विभागाचा अभिनव उपक्रम

संघरत्न सपकाळे भुसावळ | प्रतिनिधी

सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचालित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा महान शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘अर्धा तास वाचन करूया’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, ज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात महाविद्यालयातील सुमारे ३० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी शांत वातावरणात विविध विषयांवरील पुस्तकांचे अर्धा तास मनोभावे वाचन केले. यामध्ये ‘बहिणाईची गाणी’, ‘कवी आणि कविता’, ‘महात्मा फुले आणि धर्म’, ‘रवींद्रनाथ टागोरांच्या निवडक कथा’, ‘शोधयात्रा’, ‘निवडक नारायण सुर्वे’, ‘विनोबा’, ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’, ‘शिवशाहीच्या पाऊलखुणा’, ‘राजर्षी शाहू महाराज’, ‘संविधानाचे अमृतपर्व’ आणि ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या पुस्तकांचा समावेश होता. या पुस्तकांमधील सामाजिक, ऐतिहासिक, साहित्यिक आणि वैचारिक आशयामुळे विद्यार्थ्यांना नवे विचार, प्रेरणा आणि वाचनाची गोडी लाभली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. जतिनकुमार मेढे, संगणकशास्त्र विभागाच्या कु. मानसी महाजन तसेच राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे उपस्थित होते.

वाचनामुळे व्यक्तिमत्त्व घडते – डॉ. किशोर कोल्हे

मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे म्हणाले, विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. एखाद्या पुस्तकाची प्रस्तावना जरी वाचली तरी त्या पुस्तकाचा आशय आणि दिशा समजते. वाचनामुळे विचार समृद्ध होतात, व्यक्तिमत्त्व घडते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो. त्यामुळे अशा प्रकारचे वाचनवर्धक उपक्रम सातत्याने राबविणे आवश्यक आहे.

या उपक्रमात प्रियंका वसाने, साक्षी भिरूड, राजश्री कोळी, हर्षदा हातकर, प्रांजल सोनावणे, हेमांगी इंगळे, ज्ञानेश्वरी जोशी, तेजस्विनी झापे, अमृता सावळे, सुजिता चौधरी, वैभव पाटील, नम्रता सावळे, सुचिता चौधरी, वेदिका पाटील, साक्षी नेमाडे, भूमिका चौधरी, समीक्षा मेढे, खुशी फिरके, पुष्कराज नेमाडे, लोकेश किरंगे, खगेश वाघुळदे, प्रतिक मेघे, हरी चौधरी, राहुल सोनावणे, अतुल हिवरकर, देवा आढळे यांच्यासह अन्य विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी दिलेला “मोठी स्वप्ने पाहा, ज्ञान मिळवा आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत कृतीतून पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version