Spread the love

रेल्वेच्या कामामुळे सोनवद पाटचारीचे नुकसान; दुरुस्तीच्या मागणीसाठी कापडणे येथील शेतकरी आक्रमक

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर; तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

सुनील निकम धुळे | प्रतिनिधी

मनमाड–इंदोर रेल्वे मार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे सोनवद पाटचारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप करत कापडणे येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. पाटचारीची दुरुस्ती करून कापडणे परिसरातील सिंचनाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून मनमाड–इंदोर रेल्वे मार्गाचे काम सुरू असून या कामादरम्यान कापडणेसह परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सोनवद पाटचारीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कापडणेसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या संदर्भात सिंचन विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही दुरुस्तीचे काम सुरू झाले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पाटचारीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.

लवकरात लवकर दुरुस्तीचे काम हाती घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा व्यापक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला.

या आंदोलनात शरद पाटील, नवल पाटील, भगवान पाटील, योगेश पाटील, संजय जैन, भूषण बामणे, गणेश सैंदाणे, मनोहर माळी, काशिनाथ भिल, सतीश पाटील, दीपक पाटील, धीरज पाटील यांच्यासह कापडणे गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version