जि.प. प्राथमिक शाळा, खनोराच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
११ विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी; विद्यार्थ्यांच्या मेहनतीला गुरुजनांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याची साथ
खनोरा (ता. रामटेक, जि. नागपूर) :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खनोरा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परीक्षेत शाळेतील आराधना खंडाते, रुद्र खंडाते, नक्ष मोरघडे, प्रज्वल कंगाले, अंश सुहागपुरे, आस्था ईनवाते, तन्नु सलामे, हेमंत मोरघडे, देवांश मोरघडे, माही कंगाले आणि मानसी सलामे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला.
विद्यार्थ्यांचे हे यश त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाचे, पालकांच्या प्रोत्साहनाचे आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचे फलित असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, मुख्याध्यापक दिपक बोरसे तसेच सर्व सहायक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम ठेवत इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे
