चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण; सात गावांच्या वीजपुरवठ्याला मोठा दिलासा
‘दिवसा वीज म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यातील उजेड’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील; उमाळा येथे जागा उपलब्ध झाल्यास नवीन वीज उपकेंद्र उभारण्याची घोषणा
जळगाव | प्रतिनिधी :
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (एमएसकेव्हीवाय) २.० अंतर्गत उभारण्यात आलेल्या ५ एमव्हीए अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे चिंचोलीसह परिसरातील सात गावांतील शेतकरी, ग्रामस्थ आणि औद्योगिक ग्राहकांना अधिक सक्षम, अखंड व दर्जेदार वीजपुरवठ्याचा लाभ मिळणार आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “दिवसा वीज म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यातील उजेड असून, शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आधुनिक व विश्वासार्ह वीज व्यवस्था ही शेती, उद्योग आणि ग्रामीण विकासाचा भक्कम पाया आहे. उमाळा येथे जागा उपलब्ध झाल्यास डीपीडीसीच्या माध्यमातून नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात येईल.”
त्यांनी सांगितले की, चिंचोली परिसरात उन्हाळ्यात वाढलेल्या वीजभारामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर उभारण्याचे निर्देश देण्यात आले होते. महावितरणचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी आणि त्यांच्या पथकाने हे काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण केल्याने चिंचोली, उमाळा, धानोरी, धानवड, देव्हारी, कुसुंबा आदी सात गावांतील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महावितरणचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांनी सांगितले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी व औद्योगिक क्षेत्राला अखंड, दर्जेदार आणि विश्वासार्ह वीजपुरवठा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असून, ग्राहकांच्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्ही. एस. कापुरे यांनी केले. प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांनी तालुक्यातील विविध वीज विकासकामांची माहिती देत अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरमुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत होणार असल्याचे सांगितले. आभार अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी मानले.
कार्यक्रमात परिसरातील सरपंच तसेच जळगाव ग्रामीण औद्योगिक असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
