शेतकऱ्यांची युरिया लूट थांबवा; चढ्या दराने खतविक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील
शेतकऱ्यांच्या तक्रारींची गंभीर दखल; पी. एम. पाटील यांनी मांडल्या समस्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीच्या कारवाईचे निर्देश
धरणगाव | प्रतिनिधी (वाल्मिक पाटील) :
धरणगाव शहरासह तालुक्यात युरिया व इतर कृषी निविष्ठांची शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. चढ्या दराने खते, बियाणे किंवा कृषी साहित्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
धरणगाव येथे आयोजित शासकीय कार्यक्रमादरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पी. एम. पाटील, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील आणि उपतालुकाप्रमुख मोतीआप्पा पाटील यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध अडचणी मांडल्या. विशेषतः काही विक्रेत्यांकडून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने खतविक्री होत असल्याचा मुद्दा त्यांनी ठामपणे उपस्थित केला.
शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी विभागाला तातडीने कारवाईचे आदेश देत, “जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने खते, बियाणे किंवा इतर कृषी साहित्य विक्री करताना कोणी आढळल्यास संबंधित विक्रेत्यांविरुद्ध त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावेत,” असे स्पष्ट निर्देश दिले.
यावेळी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी रोहन घुले यांनीही प्रकरण गांभीर्याने घेत कृषी विभागाला तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. खतविक्री केंद्रांची तपासणी, साठ्याची पडताळणी तसेच दरफलकांची पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पी. एम. पाटील यांनी धरणगाव तालुका गुणवत्ता अधिकारी परेश बडगुजर यांच्याशी स्वतंत्र चर्चा करून शेतकऱ्यांच्या तक्रारींची तातडीने नोंद घेऊन त्यावर प्रभावी कारवाई करण्याची मागणी केली. तसेच खत, बियाणे किंवा कृषी साहित्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
खरीप हंगामात युरियाची मागणी वाढलेली असताना जादा दराने खतविक्री होत असल्याच्या तक्रारींमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. पालकमंत्र्यांच्या कठोर आदेशांनंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आता दोषींवर होणाऱ्या प्रत्यक्ष कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
