बहुजन मुक्ती पार्टी देशात तिसऱ्या राजकीय शक्तीची निर्मिती करीत आहे : वामन मेश्राम
पुण्यात बहुजन मुक्ती पार्टीचे चौथे राज्य अधिवेशन उत्साहात; राज्यभरातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
पुणे | प्रतिनिधी :
बहुजन मुक्ती पार्टीचे चौथे राज्य अधिवेशन रविवारी (दि. २६ जुलै) पुण्यातील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बहुजन समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.
अधिवेशनाचे उद्घाटन माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते झाले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम होते. यावेळी बोलताना मेश्राम यांनी “बहुजन मुक्ती पार्टी देशात तिसऱ्या राजकीय शक्तीची निर्मिती करण्याच्या दिशेने काम करत आहे,” असे प्रतिपादन केले.
अधिवेशनाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते आप्पासाहेब प्रेम गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राज्य महासचिव संतोष विश्वकर्मा यांनी केले, तर आभार पुणे शहराध्यक्ष शतायुभाऊ बगळे यांनी मानले.
कार्यक्रमाला राज्याध्यक्ष प्रताप पाटील, राज्य प्रभारी सचिन बनसोडे, राष्ट्रीय पदाधिकारी ॲड. विद्याताई त्रिरत्ने, राज्य युवाध्यक्ष दिपक शिंदे, महिला आघाडीच्या राज्यप्रभारी सुषमा मेहता, राज्याध्यक्षा हेमलता पाटील, राष्ट्रीय शीख मोर्चाचे राज्य प्रभारी हरविंदरसिंग खालसा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राज्याध्यक्ष हिजबुल रेहमान तसेच लहुजी क्रांती मोर्चाचे राज्य सल्लागार अंकलजी सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आयोजकांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ३६ जिल्हे आणि ३५८ तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी अधिवेशनात सहभाग घेतला. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. सभागृहाची आसनक्षमता पूर्ण झाल्याने अनेक कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर उभे राहून भाषणे ऐकली.
अधिवेशनात विविध वक्त्यांनी सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक विषयांवर मार्गदर्शन केले. बहुजन समाजाचे संघटन, संविधानिक मूल्यांचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि भविष्यातील राजकीय वाटचाल यासंदर्भात विविध मुद्द्यांवर मते व्यक्त करण्यात आली.
वामन मेश्राम यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि भाजपच्या कारभारावर टीका करत संविधानाच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज अधोरेखित केली. तसेच बहुजन समाजाच्या राजकीय सक्षमीकरणासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचे आवाहन केले.
