अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आरपीआय (आठवले)चे जळगावात आंदोलन
जातीनिहाय जनगणनेपूर्वी उपवर्गीकरण करू नये; २७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने निदर्शने
जगदीश सपकाळे जळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींचे ‘अ, ब, क, ड’ असे उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), जळगाव महानगरच्या वतीने मंगळवार, २७ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निदर्शने करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जळगांव महानगर अध्यक्ष तथा मा. पुरवठा दक्षता समिती सदस्य, पोलिस समन्वयक समिती सदस्य, नगरसेवक जळगांव शहर महानगर पालिका अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शासनाने जातीनिहाय जनगणना पूर्ण होण्यापूर्वी अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करू नये, अशी ठाम मागणी करण्यात आली. पक्षाच्या वतीने अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रस्तावित उपवर्गीकरण प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने अनुसूचित जातींतील ५९ जातींचे ‘अ, ब, क, ड’ अशा गटांमध्ये उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय अशा प्रकारचा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमध्ये सामाजिक दरी वाढण्याची आणि जाती-जातींमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
लोकशाही मार्गाने आंदोलन करत शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न असल्याचे आरपीआय (आठवले) पदाधिकाऱ्यांनी सांगितले. समाजात ऐक्य आणि सलोखा कायम राहावा, तसेच दलित समाजात फूट पडू नये, यासाठी शासनाने उपवर्गीकरणाची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात पक्षाचे जिल्हा सचिव भरत मोरे, भीमराव साळुंखे, प्रताप बनसोडे, दादाराव अडकमोल, अक्षय मोरे, हरीश शिंदे, मिलिंद अडकमोल, विमलबाई सपकाळे, मंगला कुमावत, सोनाली अडकमोल, उज्ज्वला अडकमोल, दिलीप अहिरे, रेखा बिन्हाडे, कमलबाई मोरे, सुनीता गाडे, शोभा सोनवणे, केशर सपकाळे, मंजुळाबाई बनसोडे, अनिता बोदडे, प्रभा ठाकूर, रत्नाबाई सपकाळे, नंदा बिन्हाडे, आक्का सोनवणे, लता भालेराव, रेखा शिराणे, कल्पना सुरवाडे, मंगला तायडे, प्रमिला गायकवाड, नंदा साळुंखे, कांता भालेराव, प्रमिला सपकाळे, सिंधू अडकमोल, आशा सपकाळे, रेखा अहिरे, राधा बाबर, रूपाली सपकाळे, दीपाली नरवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते. आरपीआय (आठवले)च्या या आंदोलनामुळे अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यात चर्चा सुरू झाली असून, या मागणीवर शासन काय भूमिका घेते, याकडे सामाजिक व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
