Spread the love

लासूर-हातेड महामार्गावर नाकाबंदी; कार, दुचाकी व मोबाईलसह ₹६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

चोपडा | प्रतिनिधी (हर्षल पाटील) 
अमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत चोपडा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत ७ किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. या कारवाईत तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून कार, दुचाकी, मोबाईल आणि गांजासह सुमारे ₹६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, लासूर-हातेड महामार्गावरून अमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली.

तपासणीदरम्यान संशयास्पद वाहनांची झडती घेतली असता त्यामधून ७ किलोहून अधिक गांजा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलिसांनी गांजासह गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक कार, एक दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण ₹६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त करण्यात आलेला गांजा कोठून आणण्यात आला होता आणि तो कोणाला विक्रीसाठी नेण्यात येत होता, याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणामागील आंतरजिल्हा अथवा आंतरराज्य तस्करीच्या साखळीचाही शोध घेतला जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version