Spread the love

एका वर्षात तीन राष्ट्रीय प्रवेश परीक्षांत घवघवीत यश; उल्हासनगरच्या सत्यजित खंडारेवर अभिनंदनाचा वर्षाव

NEET मध्ये ५७७ गुण, JEE मध्ये ९३.७४ पर्सेंटाईल आणि IISER प्रवेश परीक्षेत कॅटेगरी रँक ४६७; डॉक्टर बनून समाजसेवेचा संकल्प

उल्हासनगर | प्रतिनिधी (सुरेश जगताप) :
उल्हासनगरच्या संभाजीनगर परिसरातील गुणवंत विद्यार्थी सत्यजित राजीव खंडारे याने एका वर्षात देशातील तीन प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रवेश परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याच्या या यशामुळे संभाजीनगरसह संपूर्ण उल्हासनगर परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी घेण्यात आलेल्या NEET-2026 परीक्षेत सत्यजितने ५७७ गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या JEE-2026 परीक्षेत गणिताचा स्वतंत्र अभ्यास नसतानाही ९३.७४ पर्सेंटाईल मिळवून त्याने आपली बौद्धिक क्षमता सिद्ध केली. याशिवाय भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (IISER) प्रवेश परीक्षेत कॅटेगरी रँक ४६७ मिळवत आणखी एक यश आपल्या नावावर नोंदवले.

राष्ट्रीय स्तरावरील तिन्ही परीक्षांमध्ये यश मिळवूनही सत्यजितने वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडविण्याचा निर्णय घेतला असून डॉक्टर बनून समाजसेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याचा मोठा भाऊ विश्वजित खंडारे हाही वैद्यकीय शिक्षण घेत असल्याने खंडारे कुटुंबाची शैक्षणिक परंपरा अधिक समृद्ध झाली आहे.

सत्यजित हा इंदिराबाई शिवराम खंडारे यांचा नातू तसेच राजीव खंडारे आणि वैशाली राजीव खंडारे यांचा सुपुत्र आहे. तसेच तो उल्हासनगरातील धम्म उपासक आणि सामाजिक कार्यकर्त्या लता एस. पडघाण यांचा भाचा असून, त्यांनीही सत्यजितच्या यशाबद्दल त्याचे विशेष अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सत्यजितच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संस्था, पत्रकार, शिक्षक तसेच नागरिकांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मेहनत, जिद्द आणि सातत्य यांच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरही यश संपादन करता येते, हे सत्यजित खंडारे याने आपल्या यशातून सिद्ध करून दाखविले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version