Spread the love

ग्लास्गो कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची सुवर्ण कामगिरी; शर्मिला धनखडला सुवर्ण, शिलपा शायलाला कांस्य

महिलांच्या पॅरा शॉटपुट F57 प्रकारात भारताची दुहेरी पदक कमाई; अधिकृत पुनरावलोकनानंतर शिलपाच्या कांस्यपदकावर शिक्कामोर्तब

ग्लास्गो | प्रतिनिधी :
ग्लास्गो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या पॅरा ॲथलेटिक्स संघाने शानदार कामगिरी करत देशाला दुहेरी आनंद दिला आहे. महिलांच्या शॉटपुट F57 प्रकारात शर्मिला धनखड हिने सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला, तर शिलपा शायला हिने नाट्यमय घडामोडीनंतर कांस्यपदक आपल्या नावावर केले.

शर्मिला धनखड हिने अंतिम फेरीत ९.८१ मीटरचा सर्वोत्तम थ्रो करत सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीमुळे भारताच्या पॅरा ॲथलेटिक्समधील दीर्घकाळाच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला. तिच्या दमदार प्रदर्शनामुळे भारताच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली.

याच स्पर्धेत भारताची शिलपा शायला हिने ७.२६ मीटरचा वैयक्तिक सर्वोत्तम (Personal Best) थ्रो नोंदवला. सुरुवातीला ती चौथ्या स्थानावर होती, तर नायजेरियाच्या खेळाडूला कांस्यपदक जाहीर करण्यात आले होते. मात्र भारतीय पथकाने निकालाबाबत अधिकृत आक्षेप नोंदवल्यानंतर झालेल्या पुनरावलोकनात नायजेरियन खेळाडूचा थ्रो फाऊल ठरविण्यात आला.

या निर्णयानंतर शिलपा शायला हिचे चौथे स्थान कांस्यपदकात रूपांतरित झाले. पदक निश्चित झाल्यानंतर शिलपा भावूक झाली आणि तिने शर्मिला धनखडसह भारताच्या या ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा केला.

भारतीय पॅरा ॲथलेटिक्ससाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला असून, या दुहेरी पदकामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version