बोरगाव खुर्दच्या सरपंचांना दोन वर्षांपासून त्रास; ग्रामस्थांचे धरणगाव पोलिस व तहसीलदारांना निवेदन
सोशल मीडियावर दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप; निष्पक्ष चौकशी करून कारवाईची मागणी
विजय पाटील बोरगाव | प्रतिनिधी :
धरणगाव तालुक्यातील बोरगाव खुर्द येथील लोकनियुक्त सरपंच अर्चना दिनकर पाटील यांना गेल्या दोन वर्षांपासून एका व्यक्तीकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी धरणगाव पोलीस ठाणे, तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी (बीडीओ) यांना निवेदन देऊन योग्य कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, संबंधित व्यक्ती रविंद्र जयराम पाटील हा ग्रामपंचायत कार्यालयात येऊन सरपंचांकडे ग्रामपंचायतीसंदर्भातील माहितीची मागणी करत होता. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरपंचांनी नंतर माहिती देण्याची विनंती केल्यानंतरही त्याने वाद घातल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, पावसामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायऱ्यांवरून घसरून संबंधित व्यक्तीला दुखापत झाली. मात्र, सरपंचांचे पती, वडील आणि काका यांनी मारहाण केल्याची तक्रार त्याने धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
सरपंचांच्या बाजूनेही संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, गावात प्रत्यक्षात घडले नसल्याचा दावा असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून गावाची आणि सरपंचांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत २७ जुलै रोजी बोरगाव खुर्द येथील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि सरपंच यांनी धरणगाव पोलीस ठाणे, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले.
