श्रीक्षेत्र कनाशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त ‘देवाची दाढ’ विशेष दर्शन व यात्रा महोत्सवाला प्रारंभ
२८ व २९ जुलै रोजी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित; पोलिसांचा चोख बंदोबस्त, आरोग्य सेवांचीही विशेष व्यवस्था
भडगाव | प्रतिनिधी (गणेश रावळ) :
भडगाव तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र कनाशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त ‘देवाची दाढ’ विशेष दर्शन व यात्रा महोत्सवाचे आयोजन मंगळवार व बुधवार, २८ आणि २९ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. या यात्रेसाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून हजारो भाविक उपस्थित राहणार असून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
श्री कन्हैयालाल बाबा मंदिराचे व्यवस्थापकीय पुजारी आणि ग्रामस्थांच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेला मोठी गर्दी अपेक्षित असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जळगाव, भडगाव आणि चाळीसगाव पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तालुका वैद्यकीय अधिकारी, कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, कनाशी उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच बोदर्डे, कोठली, निंभोरा, गोंडगाव, कनाशी, देव्हारी, लोण आणि बोरणार येथील आशा सेविका सेवेसाठी तैनात राहणार आहेत.
यात्रेत मिठाई, खेळणी, झुले, पालखी तसेच संसारोपयोगी वस्तूंची अनेक दुकाने उभारण्यात आली आहेत. दर्शनासाठी मंदिर परिसरात एक ते दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागत असून भाविक नारळ, विड्याची पाने, सुपारी, फळे, फुले, नैवेद्य अर्पण करून मनोभावे दर्शन घेत आहेत.
मंदिरात गुरुपौर्णिमेपूर्वीपासूनच भाविकांची मोठी गर्दी होत असून पंजाब, दिल्ली, चंदीगड, हरियाणा, जम्मू-काश्मीर, मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली आणि नागपूर आदी भागांतून हजारो भक्त श्रीक्षेत्र कनाशी येथे दाखल होत आहेत. पावसाची पर्वा न करता भाविक शांततेत दर्शन घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यात्रेनिमित्त महंत श्री. खामनीकर बाबा आणि श्री. लांडगे बाबा यांच्या आश्रमात भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
