कातकरी महिलेच्या मदतीसाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा तातडीचा हस्तक्षेप; श्रमजीवी संघटनेकडून आभार
पीडित महिलेच्या तक्रारीची तात्काळ दखल; पोलीस प्रशासनाच्या संवेदनशील भूमिकेचे श्रमजीवी संघटनेकडून कौतुक
ठाणे | प्रतिनिधी (प्रशांत ल. ढोणे) :
संकटात सापडलेल्या कातकरी समाजातील एका महिलेच्या मदतीसाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी केलेल्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. त्यांच्या संवेदनशील आणि तत्पर भूमिकेबद्दल श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा सीता घाटाळ यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
मुरबाड तालुक्यातील कातकरी समाजातील ममता वाघ यांनी गुगलवरून श्रमजीवी संघटनेचा संपर्क क्रमांक मिळवून संघटनेशी संपर्क साधला. त्यांनी आपल्या बहिणी लक्ष्मी कोकणे हिच्यावर तिच्या पतीकडून सातत्याने शारीरिक अत्याचार होत असल्याची माहिती दिली. गंभीर मारहाणीमुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
ही माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा सीता घाटाळ यांनी तातडीने संघटनेचे मुरबाड तालुका सचिव दिलीप शीद यांना मदत व समन्वयासाठी सूचना दिल्या. तसेच ममता वाघ यांना जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार ममता वाघ या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गेल्या. मात्र, तेथे त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर सीता घाटाळ यांनी दूरध्वनीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.
यानंतर ही बाब ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी तात्काळ दखल घेत कल्याण विभागाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पगारे यांनी ममता वाघ यांचा जबाब नोंदवून घेतला आणि जुन्नर पोलीस ठाण्याशी समन्वय साधून पुढील कार्यवाही सुरू केली.
दरम्यान, पीडित महिला लक्ष्मी कोकणे यांनी पोलिसांसमोर पतीकडून सातत्याने छळ होत असल्याचे सांगितले असून, अधिकृत जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या प्रकरणात पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दाखविलेली संवेदनशीलता, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा ही नागरिकाभिमुख पोलीस प्रशासनाचे उदाहरण असल्याचे श्रमजीवी संघटनेने म्हटले आहे. तसेच पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक सुनील पगारे आणि सहकार्य करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले.
