भुसावळच्या ममता कंवरचा राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत डंका; सुवर्णपदक पटकावत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा
फगवाडा (पंजाब) येथे झालेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी; प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावर भुसावळसह जळगावचे नाव उज्ज्वल
भुसावळ | प्रतिनिधी : संघरत्न सपकाळे
पंजाब राज्यातील फगवाडा येथे १५ ते १९ जुलैदरम्यान आयोजित राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भुसावळ येथील युवा बॉक्सिंगपटू ममता कंवर हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे भुसावळ शहराच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ममता कंवर ही भुसावळ येथील केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी असून सेल्फ डिफेन्स स्पोर्ट्स असोसिएशनची बॉक्सिंग खेळाडू आहे. तिच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राची प्रतिष्ठा वाढली आहे.
यापूर्वीही ममता कंवर हिने राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके मिळविली आहेत. प्रशिक्षक भीमज्योत शेजवळ, राकेश सपकाळे आणि सुमेध शेजवळ यांच्या नियमित प्रशिक्षण, कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनामुळे तिने ही यशस्वी कामगिरी केली आहे.
आपल्या यशाचे श्रेय ममता कंवर हिने आई-वडील, प्रशिक्षक तसेच केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य डी. एस. नंदेश्वर, शिक्षिका प्रिया सिंग, राजकिरण निकम, लीलाधर सिंग कंवर, राम जवरे, हरतिश लौढे, सुरेश वानखेडे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांना दिले आहे.
ममता कंवरच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्था तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे भुसावळ तालुकाध्यक्ष संघरत्न सपकाळे तसेच पत्रकार सुनील अराक यांनीही तिच्या यशाचे कौतुक केले आहे.
