Spread the love

महात्मा फुले हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण; ‘एक माजी विद्यार्थी – एक वृक्ष’ उपक्रमाचे आवाहन

‘झाडे लावा-झाडे जगवा’चा संदेश; माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणीसाठी एक वृक्ष भेट द्यावा – मुख्याध्यापक जे. एस. पवार

धरणगाव | प्रतिनिधी : वाल्मिक पाटील

धरणगाव येथील सुवर्ण महोत्सवी महात्मा फुले हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त शालेय प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. महापुरुष, महामाता आणि संतांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

धरणगाव नगर परिषदेच्या सहकार्याने वृक्षारोपणासाठी शाळेच्या परिसरात जेसीबीच्या माध्यमातून खड्डे खोदण्यात आले तसेच वृक्षांच्या संगोपनासाठी खताचीही व्यवस्था करण्यात आली.

मुख्याध्यापक जे. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल येथील संगनील नर्सरीमार्फत कर्नाटकातून आणण्यात आलेली सुमारे १५ फूट उंचीची ‘फॉक्सल पाम’ जातीची पाच रोपे शाळेच्या परिसरात लावण्यात आली. या वृक्षारोपणात सामाजिक कार्यकर्ते दिनेश शेठ लोहार, नगर परिषदेचे शहर समन्वयक निलेश वाणी, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

शाळेच्या परिसरात आणखी दहा खड्डे तयार करण्यात आले असून, त्यामध्येही लवकरच वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी मुख्याध्यापक जे. एस. पवार यांनी ‘एक पेड माँ के नाम’ आणि ‘आमचे विद्यार्थी – आमचा अभिमान’ या उपक्रमांतर्गत शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या शाळेच्या आठवणीसाठी एक वृक्ष भेट देण्याचे आवाहन केले. “वृक्ष हे आपले खरे मित्र आहेत. त्यांची लागवड करण्याबरोबरच संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे सांगत त्यांनी ‘झाडे लावा – झाडे जगवा’ हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version