मविप्र संस्थेच्या ताब्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर; अॅड. विजय भास्कर पाटील अटकेत
जिल्हापेठ पोलिसांची मोठी कारवाई; फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि विद्यापीठाची दिशाभूल केल्याचा आरोप
जळगाव | प्रतिनिधी :
जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित (मविप्र) संस्थेच्या कारभाराचा ताबा मिळवण्यासाठी कथितपणे बनावट व खोटी कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत संशयित अॅड. विजय भास्कर पाटील यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे शैक्षणिक, कायदेशीर आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मविप्र संस्थेच्या निवडणुकीत गोकुळ पिंटू बोरसे (पाटील) यांची चेअरमनपदी, तर नीलेश रणजित भोईटे यांची मानद सचिव म्हणून निवड झाली होती. या बदलाची नोंद करण्यासाठीचा फेरफार अर्ज धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित असून, शासनाच्या ५ मार्च २०१८ च्या आदेशानुसार संस्थेचे अधिकार सध्या भोईटे गटाच्या कार्यकारी मंडळाकडे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, अॅड. विजय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःला संस्थेचे वैध कार्यकारी मंडळ असल्याचे भासवत सहकार विभागातील नोंदींचा कथित गैरवापर केला. संस्थेचा ताबा मिळविण्याच्या उद्देशाने बनावट व खोटी कागदपत्रे तयार करून त्यांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे ही कथित बनावट कागदपत्रे सादर करून प्रशासनाची दिशाभूल करण्यात आल्याचाही आरोप आहे. विशेषतः विद्यापीठाच्या मागासवर्ग कक्षाला चुकीची माहिती पुरविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी संस्थेचे मानद सचिव नीलेश भोईटे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयित अॅड. विजय भास्कर पाटील यांना अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय भांडारकर करीत असून, या कथित गैरप्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.
