भडगाव-चाळीसगाव मार्गावरील दुर्घटना; निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
भडगाव | प्रतिनिधी : गणेश रावळ
भडगाव-चाळीसगाव मार्गावरील तांदुळवाडी फाट्याजवळ मंगळवारी (दि. २८ जुलै) सायंकाळी सुमारे ६.३० वाजता झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच-५४-०१३१ क्रमांकाची आयशर गाडी चालक अरबाज शाफिक मन्यार (रा. यशवंत नगर, भडगाव) हा भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवत असताना समोर असलेल्या एमएच-१९-डीयू-४१९५ क्रमांकाच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत धनराज भगवान निकुंभ (रा. घुसर्डी, ता. पाचोरा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक प्रशांत पंडित एरंडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी मयताचे काका पंडित शामजी निकुंभ (रा. घुसर्डी, ता. पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर चालक अरबाज शाफिक मन्यार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाताचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत.
