Spread the love

पाचोरा–जळगाव महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था; अपघाताचा धोका वाढला

पीजी लाईन परिसरात १२ ते १४ इंच खोल खड्डे; तातडीने दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी

पहान प्रतिनिधी तालुका पाचोरा | प्रतिनिधी :
पाचोरा–जळगाव महामार्गावर पाचोरा शहरापासून सुमारे ५ ते ७ किलोमीटर अंतरावरील पीजी लाईन परिसरात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसामुळे त्यामध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.

स्थानिक प्रतिनिधींनी परिसराची पाहणी केली असता रस्त्यावर सुमारे १२ ते १४ इंच खोल खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. या मार्गावर दररोज हजारो लहान-मोठी वाहने धावत असतानाही संबंधित यंत्रणेकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. “रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे?” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार दुरुस्तीची मागणी केली असून, संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने रस्ता दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version