Spread the love

मेहरूण परिसरातील उघड्या रोहित्रांमुळे जीवितास धोका; महावितरणाच्या कारभारावर नागरिकांचा संताप

रामेश्वर कॉलनीतील विद्युत रोहित्रे सुरक्षाविना उघडी; तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

वाल्मीक जाधव  जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनीमध्ये महावितरणाच्या विद्युत रोहित्रांची (ट्रान्सफॉर्मर) अत्यंत धोकादायक अवस्था समोर आली असून, अनेक ठिकाणी रोहित्रांचे इलेक्ट्रिक बॉक्स उघडे असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली असून नागरिकांनी महावितरणाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही रोहित्रे रस्त्यालगत, चौकात तसेच शाळेजवळ उघड्यावर असून त्यांना कोणतेही सुरक्षित दरवाजे किंवा संरक्षण कवच बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे परिसरातील शालेय विद्यार्थी, नागरिक तसेच मोकाट जनावरे यांच्यासाठी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

नागरिकांचा आरोप आहे की, वारंवार वीजबिल वसुलीवर भर दिला जात असला तरी अशा धोकादायक विद्युत यंत्रणांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यात उघड्या विद्युत उपकरणांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.

स्थानिक नागरिकांनी महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उघड्या रोहित्रांना सुरक्षित दरवाजे बसवावेत, परिसराची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version