शेतातील पंपाची मोटर चोरीचा गुन्हा उघड; तिघांना अटक, एक लाखांचा मुद्देमाल जप्त
व्यसनासाठी चोरी केल्याची कबुली; पारोळा पोलिसांची जलद कारवाई
संदीप पाटील पारोळा | प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील मंगरूळ येथे शेतातील विहिरीवरील पंपाची मोटर चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना पारोळा पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेली मोटर व गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मनोहर युवराज पाटील (२७), बबलू महारू पाटील (२५) आणि रवींद्र अंकुश पाटील (२८, सर्व रा. मंगरूळ) अशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी मंगरूळ येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीवरील पंपाची मोटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. चोरीचा प्रकार त्वरित लक्षात येऊ नये म्हणून आरोपींनी मोटरच्या जागी दगड बांधून विहिरीत टाकला होता. काही दिवसांनी शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीवर गेल्यानंतर मोटरऐवजी दगड असल्याचे निदर्शनास आले आणि चोरीचा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी २८ जुलै रोजी पारोळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस उपनिरीक्षक डॉ. शरद पाटील तसेच मिथुन पाटील आणि आकाश पाटील यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत मंगरूळ येथील तिघा संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेली पंपाची मोटर आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. प्राथमिक चौकशीत व्यसनासाठी पैशांची गरज भासल्याने मोटर चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहेत.
