गावठाण जागेअभावी रमाई आवास लाभार्थ्यांची घरकुले रखडली; BDO कडे उपसरपंचांची लेखी मागणी
60 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्याची मागणी
शिवराम जाधव सोयगाव | प्रतिनिधी
केंद्र व राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये मंजूर झालेल्या पात्र लाभार्थ्यांकडे स्वतःच्या नावाची जागा नसल्यामुळे अनेकांची घरकुले रखडली असून, हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी पुढे आली आहे.
यासंदर्भात माळेगाव/पिंपरी (ता. सोयगाव) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. सुनिता शिवराम जाधव यांनी 27 जुलै 2026 रोजी पंचायत समिती सोयगावचे गटविकास अधिकारी (BDO) यांना लेखी निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गावातील अनेक पात्र लाभार्थी गेल्या 60 वर्षांपासून एकाच जागेवर वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांच्या नावावर 7/12 उतारा किंवा नमुना क्रमांक 8-अ नसल्याने रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे बांधकाम सुरू होऊ शकत नाही.
शासनाच्या नियमांनुसार स्वतःच्या नावावर जागा नसलेल्या पात्र लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीमार्फत गावठाण जागा उपलब्ध करून देण्याची तरतूद असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे 60 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या लाभार्थ्यांच्या जागेबाबत ग्रामपंचायतीकडून ठराव करून त्यांना गावठाण जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश तातडीने द्यावेत, अशी मागणी उपसरपंच सौ. सुनिता जाधव यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान, रमाई आवास योजनेचे लाभार्थी आता BDO कार्यालयाकडून आदेश कधी निर्गमित होणार, याकडे आशेने लक्ष ठेवून असून, आदेशानंतर रखडलेली घरकुले मार्गी लागतील, अशी अपेक्षा लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.
